कुरखेडा: विद्यार्थीनीला सुसाट दूचाकीने मागून येत जोरदार धडक दिल्याने दुचाकी चालक ठार तर विद्यार्थीनी गंभीर जखमी


ता.प्र / कुरखेडा, 27 मार्च : महाविद्यालयातून परत येत असताना विद्यार्थीनीला सुसाट दूचाकीने मागून येत जोरदार धडक दिल्याने दुचाकी चालक ठार तर विद्यार्थीनी गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवार 27 मार्च रोजी सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास कूरखेडा-देसाईगंज मार्गावरील विद्यानगर वळणावर घडली. आचल जिवन कोडाप (20) रा. मौशी असे अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे तर विनोद रमेश तोडफोडे (36) रा. नान्ही असे मृतक दुचाकीस्वाराचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, कुरखेडा येथील मुनघाटे महाविद्यालयात बि.ए. प्रथम वर्षाला शिकणारी विद्यार्थीनी आचल जिवन कोडाप ही सकाळ पाळीत असलेला वर्ग आटोपत महाविद्यालयातून शहराकडे वर्ग मैत्रिणीसह पायीच परत येत होती. दरम्यान याच वेळी सुसाट वेगात येत इलेक्ट्रिक कारागीर असलेला दुचाकी चालक विनोद रमेश तोंडफोडे याने विद्यार्थीनीला मागून जोरदार धडक दिल्याने दोघेही रस्त्यावर कोसळले. यात त्यांचा डोक्याला हातापायाला गंभीर दुखापत झाली. लगेच त्यांना 108 क्रमांकाचा रुग्णवाहिकेने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे प्राथमिक उपचारानंतर विनोद तोंडफोडे याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे हलविण्यात आले मात्र उपचारा दरम्यान सांयकाळी 4 वाजताच्या दरम्यान त्याची प्राणजोत मावळली.

कुरखेडा-वडसा मार्गावर यापूर्वीही एका शिक्षकाचा अपघात होऊन मृत्यू झाला आहे. अनेक अल्पवयीन मुले सुसाट वाहने चालवत असतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते अशातच शहरात व मार्गावर धावणाऱ्या सुसाट चालणाऱ्या वाहनांवर अंकुश घालण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.