सत्तासंघर्षावरील निकालाची “सत्ताधाऱ्यांना चाहूल लागलीय, मंत्रालयात लगबग सुरू ?


महाराष्ट्रातल्या सत्तांघर्षावरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी काल (१६ मार्च) संपली. यावेळी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी सत्ताधाऱ्यांच्या वकिलांना काही प्रश्न विचारले. त्यानंतर सरन्यायाधीश सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागले. यांदर्भात काँग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रपतींकडे तक्रार केली आहे. याबाबत माध्यमांच्या प्रतिनिधींनी सवाल केल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, “केंद्र सरकारवर आता विश्वास राहिलेला नाही. राज्यात ट्रोलिंगसाठी भाड्याचे टट्टू सत्ताधाऱ्यांनी बसवले आहेत. ट्रोलिंगसाठी त्यांना पैसे दिले जातात. म्हणूनच आमच्या काही खासदारांनी राष्ट्रपतींकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे.”
पटोले म्हणाले की, “मला मिळालेल्या माहितीनुसार मंत्रालयात लगबग सुरू आहे. आमच्या लोकांनी सांगितलं की मंत्रालयातील लगबग फारच वाढली आहे. जुन्या फाईल्स पटापट काढल्या जात आहेत. त्यावरुन असं वाटतंय की त्यांना (सत्ताधाऱ्यांना) काहीतरी चाहूल लागली आहे.”


“एखादं सरकार जेव्हा जातं…”
विधान भवनाच्या बाहेर टीव्ही ९ मराठीशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, “मंत्रालयातल्या परिस्थितीबद्दल मी जे काही ऐकतोय. आमच्या लोकांकडून जे काही मला समजलं आहे, त्यावरून मी म्हणेन काहीतरी गडबड आहे. परंतु न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत मी काही बोलणार नाही. परंतु मंत्रालयातील लगबगीबद्दल मी बोलतोय. एखादं सरकार जेव्हा जातं तेव्हा अशी लगबग दिसते. आम्ही आता न्यायालयाच्या निकालाची वाट पाहतोय. आमचा प्लॅन ए आणि बी असे दोन्ही प्लॅन ठरले आहेत.”