अपघातातील युवकाचा मृत्यू,कोलारी येथील युवकाची आत्महत्या


शंकरपूर : दुचाकीसमोर रानडुक्कर आल्याने झालेल्या अपघातात एका ३५ वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

हा अपघात सोमवारी झाला. शंकरपूर येथील प्रशांत गायकवाड हा गावोगावी जाऊन धान्य खरेदीचा व्यवसाय करीत होता. सोमवारी तो धान्य खरेदीसाठी भिसी परिसरात स्वतः च्या दुचाकीने जात असताना गडपिपरीजवळ रानटी डुक्कर आडवे आल्याने तो दुचाकीवरून खाली पडला.

त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने नागपूर येथील ट्रॉमा हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी मेंदूवर शस्त्रक्रिया केली. परंतु शनिवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मागे आई, पत्नी व तीन मुली आहेत.

कोलारी येथील युवकाची आत्महत्या

शंकरपूर : येथून जवळच असलेल्या कोलारी येथील युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. कोलारी येथील रूपेश देवराव कडू [२७] या युवकाने आपल्या राहत्या घरी दुपट्ट्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारच्या वेळी आई दुसयाच्या घरी गेली होती. त्यामुळे तो घरी एकटाच होता. त्याचवेळी आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. संध्याकाळी आई घरी आल्यावर तिला मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. हा प्रकार लक्षात येताच कुटुंबाने पोलिसांकडे तातडीने तक्रार केली. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. पुढील तपास पोलिस अमित उरकुडे करीत आहेत.