लाखांदूरवरुन पिंपळगावकडे भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू


फाईल फोटो

भंडारा : - लाखांदूरवरुन पिंपळगावकडे भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज ६ मार्च रोजी सकाळी ८.३० च्या सुमारास लाखांदूर येथील शवविच्छेदन गृहाच्या मागील पटांगणावर घडली. खेडचंद शेडमाके वय २९ वर्षे रा. धाबेटेकडी, ता. अर्जुनी असे मृत चालकाचे नाव आहे.

पिंपळगाव येथील आशिष परशुरामकर यांच्या मालकीचा अपघातग्रस्त ट्रॅक्टर आहे. हा ट्रॅक्टर विटा भरून लाखांदूरवरून पिंपळगावकडे जात होता. यावेळी लाखांदूर येथील शवविच्छेदन गृहाच्या मागील पटांगणावरील रस्त्यावर भरधाव असलेला ट्रॅक्टर अनियंत्रित झाला. ट्रॅक्टर चालक खेडचंद शेडमाके हा ट्रॅक्टर नियंत्रित करण्याच्या बेतात असताना अचानक उसळून ट्रॅक्टरखाली पडला व यातच त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच जमावातील नागरिकांनी त्याला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.