गावकरी डीजेवर नाचत राहिले अन् गव्हाच्या शेतात तरुणीवर रात्रभर बलात्कार;

Champaran Rape Case : तरुणीचं अपहरण करून तिला गव्हाच्या शेतात नेण्यात आलं. त्यानंतर आरोपींनी आळीपाळीनं तिच्यावर रात्रभर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.


Rape Case Champaran Bihar : दिल्लीतील महिला कर्मचाऱ्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता बिहारमधून अंगाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. डीजेवर नाचत असलेल्या भावाला बोलावण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन तरुणीचं अपहरण करून तिच्यावर दोन नराधमांनी रात्रभर आळीपाळीनं बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. बिहारची क्रांतिभूमी असलेल्या चंपारण जिल्ह्याला कलंक लावणाऱ्या या घटनेमुळं देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. ज्यावेळी आरोपी तरुणीवर बलात्कार करत होते, त्यावेळी गावातील नागरिक डीजेच्या तालावर थिरकत होते, त्यामुळं तरुणीची आरडाओरड कुणालाही ऐकू आली नाही. त्यानंतर आता या प्रकरणाचा भांडाफोड झाल्यानंतर चंपारण पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या चंपारण जिल्ह्यातली एका गावात डीजेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पीडित तरुणी भावाला बोलावण्यासाठी घराबाहेर पडली. परंतु त्याचवेळी तिच्यावर नजर ठेवून असलेल्या आरोपींनी तरुणीचं अपहरण करत तिला गव्हाच्या शेतात नेलं. त्यानंतर रात्रभर आळीपाळीनं तिच्यावर बलात्कार केला. पीडित तरुणीनं जीवाच्या आकांतानं आरडाओरडा केला, परंतु डीजेच्या आवाजामुळं तिचा आवाज कुणालाही ऐकू आला नाही. त्यानंतर पहाटेच्या सुमारास आरोपी तरुणीला घटनास्थळीच सोडून पसार झाले. त्यानंतर पीडितेनं तिच्यासोबत घडलेला संतापजनक प्रकार गावकऱ्यांना सांगितला. त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून दोन आरोपींवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय चंपारण पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.