अन् चितळ आला शाळेत, उडाली खळबळ


चंद्रपूर : :- पाण्याच्या शोधात वन्यप्राणी मानवी वस्तीत शिरत असल्याच्या घटना अलीकडे वाढत आहेत. अशातच सिंदेवाही तालुक्यातील एका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात चितळ शिरल्याची घटना घडली. यावेळी शाळा सुरू होती.शाळेतील विद्यार्थी व शिक्षक पवन मोहुर्ले उपस्थित होते. चितळ शाळेच्या आवारात शिरल्याने खळबळ उडाली. ही घटना समजताच शाळेच्या आवारात मोठी गर्दी झाली होती. या घटनेची माहिती ग्रामस्थांनी वनविभागाला दिली.

दरम्यान, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी चितळला पकडून जंगलात सोडले. वनविभागाला माहिती दिल्यानंतर रेस्क्यू टिम आणि मानव वन्यजीव रक्षक तातडीने घटनास्थळी पोहोचले.यावेळी त्यांना चितळ ग्रामस्थांनी सुरक्षित ठेवल्याचे दिसले. त्यानंतर वनविभागाच्या पथकाने या चितळला सुरक्षित जंगलात सोडले.मानवी वस्तीत चितळ येण्याची घटना दुर्मिळ असली तरी पाण्याच्या शोधात वन्यप्राणी मानवी वस्तीत शिरत असण्याची शक्यता आहे.