पत्नी व लेकरांसमोर तलाठ्यावर एसीबीची कारवाई


सोलापूर : लाच घेण्यासाठी सरकारी लोकसेवक काय शक्कल लढवतील याचा अंदाज लावणे अवघड आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील दहीवली गावचे तलाठी सहदेव शिवाजी काळे (वय ५४ वर्ष) यांना राहत्या घरी शेतकऱ्याकडून दहा हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. धक्कादायक म्हणजे तलाठ्याच्या बायको-पोरांसमोरच एसीबीने कारवाई केली.


शेतजमीन विभक्त करून वेगवेगळे उतारे करून देण्यासाठी तलाठ्याने एकूण ३५ हजार रुपये लाच मागितली होती. तडजोड अंती ३० हजार रुपये ठरले होते. त्यामधील पहिला हफ्ता म्हणून १० हजार देण्याचे ठरले होते. तक्रारदार याने याबाबत एसीबीच्या सोलापूर कार्यालयात तक्रार केली होती. एसीबीने कारवाई करत, तलाठी सहदेव काळे यांस लाच घेताना रंगेहाथ कारवाई केली आहे. विशेष म्हणजे तलाठी सहदेव शिवाजी काळे याने स्वतःच्या निवासस्थानी सज्जा कार्यालय थाटले होते.



दहा हजारांचा पहिला हफ्ता घेताना धरपकड
माढा तालुक्यातील दहीवली गावचे तलाठी सहदेव काळे यांच्याकडे एका शेतकऱ्याने शेतजमीन विभक्त करण्यासाठी अर्ज केला होता. यासाठी तलाठी सहदेव काळे यांनी ३५ हजार रुपयांची लाच मागितली होती, तडजोडी अंती ३० हजार रुपये ठरले होते. पहिला हफ्ता म्हणून दहा हजार रुपये देण्याचे ठरले होते. शेतकऱ्याने याबाबत सोलापूरच्या एसीबी कार्यालयात तक्रार दाखल केली होती. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी शहानिशा करून सापळा लावला होता. तलाठी सहदेव काळे यांनी सज्जा कार्यालय कुर्डवाडी येथील राहत्या घरी शेतकऱ्यास बोलावून घेतले. दहा हजार रुपये स्वीकारताना कारवाई केली.

पत्नी व लेकरांसमोर तलाठ्यावर एसीबीची कारवाई

दहीवली गावचे तलाठी सहदेव काळे याने कुर्डवाडी येथील राहत्या घरी लाच स्वीकारली. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब सहदेव काळे यांना ताब्यात घेतले. त्यावेळी सहदेव काळे यांची पत्नी व मुलं समोरच होती. पत्नी व लेकरांसमोर एसीबीची ही पाहिल्यांदाच कारवाई असावी. यावेळी एसीबीचे निरीक्षक चंद्रकांत कोळी, पकाले, जाधव, सन्नके, सुरवसे आदी उपस्थित होते.