उद्धव ठाकरे यांच्या मालेगावातील सभेपूर्वीच ठाकरे गटाला एकनाथ शिंदेंकडून धक्का

ठाणे : रत्नागिरीतील खेडमध्ये सभा झाल्यानंतर आज मालेगावमध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. दरम्यान, या सभेपूर्वीच ठाकरे गटाला नाशिकमधून मोठा धक्का बसल्याचे समोर आले आहे. गेल्या सात ते आठ महिन्यांपासून राज्यातील कानाकोपऱ्यातील विविध पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते हे बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये आणि आनंद दिघे यांच्या शिकवण असलेल्या शिवसेनेत प्रवेश करताना दिसताय. आजही नाशिकच्या ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या १५ ते २० महिला पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. नाशिक येथील ठाकरे गटातील तसेच इतर पक्षातील ५०० हून अधिक कार्यकर्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती मध्ये शिवसेना पक्षात प्रवेश केला. ठाण्यातील टेंभीनाका येथील आनंद आश्रमात हा पक्ष प्रवेश झाला. महिला आघाडी, तरुण वर्ग, तसेच जिल्हापातळीवरील पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश सोहळा झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत दाखल झालेल्या सर्वांचे स्वागत केले.