महाराष्ट्रातील गरीब मुलींचा लग्नासाठी गुजरातमध्ये सौदा एक दोन लाखात होतेय विक्री, विधान परिषदेत माहिती



महाराष्ट्रातील गरीब अल्पवयीन मुलींचा राजस्थान व गुजरातमध्ये काही लाख रूपयांमध्ये सौदा होत असल्याची धक्कादायक माहिती विधान परिषदेतील लेखी उत्तरातून समोर आली आहे. यासंदर्भात यावर्षी २४ गुन्हे नोंद झाल्याची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.



रासप आमदार महादेव जानकर यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्‍न विचारला होता. या प्रश्‍नाला लेखी उत्तर देताना फडणवीस यांनी ही माहिती दिली. २०२१ मध्ये महिलांचे विवाहासाठी अपहरण केल्याप्रकरणी ४०५ गुन्हे नोंदवले होते. विवाहासाठी ४१८ महिलांचे अपहरण झाले होते. त्यामध्ये ३६३ अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. तर या गुन्ह्यांमध्ये ४४८ आरोपींना अटक झाली होती. 



२०२३ मध्ये राज्यात विवाहासाठी अपहरण करण्यात आल्याप्रकरणी २४ गुन्हे नोंद केले आहेत. राज्यातून गरीब व अल्पवयीन मुलींची राजस्थान व गुजरात राज्याच्या काही गावांमध्ये विवाहासाठी १ ते २ लाख रूपयात सौदा केला जातो, हे अंशत: खरे असल्याचे फडणवीस म्हणाले.



मुंबईतून २०२२ मध्ये १३३० अल्पवयीन मुली बेपत्ता होत्या. त्यापैकी १०९७ मुली सापडल्या आहेत. १८ वर्षावरील ४४३७ महिला हरवल्याची नोंद २०२२ मध्ये झाली होती. त्यापैकी ३०३९ महिला सापडल्या आहेत. हरवलेली मुले, मुली शोधण्यासाठी ऑपरेशन मुस्कान आणि ऑपरेशन रियुनाइट राबवण्यात येत असल्याचे फडणवीस म्हणाले.