मुरैना : शाळेला शिक्षणाचं मंदिर म्हटले जाते. पण मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यातील एका खाजगी शाळेत मुख्याध्यापकांच्या कार्यालयात चक्क दारूच्या बाटल्या आणि कंडोमसह (Condom Found in School) इतर आक्षेपार्ह साहित्य आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. शालेय शिक्षण अधिकारी शनिवारी अचानक तपासणी करण्यासाठी शाळेत आले होते. त्यादरम्यान शाळेच्या मुख्याध्यापकांच्या खोलीत दारू आणि कंडोमसह (Liquor and Condoms Found in School) आक्षेपार्ह साहित्य सापडले. या तपासणीनंतर अधिकाऱ्यांनी शाळा सील केली.
मुरैना येथील सेंट मेरी शाळेत हा खळबळजनक प्रकार घडला. या शाळेच्या मुख्याध्यापकाला अटक करण्यात आली आहे. मध्य प्रदेश बाल संरक्षण आयोगाच्या सदस्याच्या पत्रानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. शाळेच्या तपासणीदरम्यान ग्रंथालयाच्या एका गुप्त मार्गावर अनेक खोल्या आढळून आल्या. प्रत्येक खोलीत पलंग आणि सुविधा आढळल्या. मुख्याध्यपाकांची शेवटची खोली होती. येथून पथकाला दारूच्या अनेक बाटल्या, कंडोमसह इतर आक्षेपार्ह साहित्य मिळाले आहे.
पोलिसांनी शाळेचा मुख्याध्यापक डायोनिसियस आर्बी याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे आणि जीवे मारण्याची धमकी देणे यासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मध्य प्रदेश बाल संरक्षण आयोगाच्या सदस्या डॉ. निवेदिता शर्मा यांनी शनिवारी शाळेला भेट दिली. यानंतर कारवाईसाठी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले.
नियमित तपासणीसाठी आले अन् प्रकार समजला
‘आम्ही या शाळेत नियमित तपासणीसाठी आलो होतो. पण जेव्हा आम्ही शाळेच्या कॅम्पसची एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात पाहणी केली तेव्हा आतून दोन्ही कोपरे कसे जोडलेले आहेत हे पाहिले. ते पाहून आम्हाला आश्चर्य वाटले. कोणीही आम्हाला तिथे न्यायला तयार नव्हते, म्हणून आम्ही पुढे निघालो. तपासणी केली असता इमारतीत प्रवेश केल्यावर आम्हाला कळले की ते निवासी सेटअप आहे. हे केवळ एका व्यक्तीचे नाही, तर त्या इमारतीतून आणखी लोक बाहेर आले जे तेथे राहत होते. ते निवास म्हणून वापरले जात होते, असे त्यांनी सांगितले.