गोंदिया :- आरोग्य सेविकेला नक्षलग्रस्त प्रोत्साहन भत्याचा लाभ देण्यासाठी ६ हजारांची लाच घेणाऱ्या देवरीच्या तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याला तदर्थ विशेष सत्र न्यायालयाने ३ वर्षांचा सश्रम कारावास व २५ हजार रूपये दंड ठोठावला. ही सुनावणी ४ मार्च रोजी करण्यात आली. डॉ. श्रीप्रकाश किशोरीलाल नागपुरे वय ६१ वर्षे असे तत्कालीन तालुका वैद्यकीय अधिकारी देवरी रा. गोंदिया असे आरोपीचे नाव आहे..
देवरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र घोनाडी येथील आरोग्य सेविका रेखा अर्जुन गोफने (२५) रा.
सिंगणडोह, पो. पालांदुर जमीदारी, ता. देवरी यांना नक्षलग्रस्त भत्यासाठी ७ हजारांची लाच मागितली होती. तडजोड अंती ६ हजारांची लाच घेताना २४ जुलै २०१४ रोजी सापडा रचून त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणात देवरी पोलिसात लाचलुचपत प्रतिबंधक कायदा अंतर्गत येथे गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणावर तदर्थ विशेष सत्र न्यायालयाने ४ मार्च रोजी सुनावणी केली. न्यायाधीश एन.बी. लवटे यांनी ही सुनावणी केली. या सुनावणीत कलम ६० (१) अंतर्गत 3 वर्षाचा सश्रम कारावास, १३ (२) अंतर्गत ३ वर्षाचा सश्रम कारावास व २५ हजार रूपये दंड ठोठावला. या प्रकरणात सरकारी वकील म्हणून अॅड. कैलाश खंडेलवाल यांनी काम पाहिले. न्यायालयात पाच साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने साक्षीदारांच्या बयानावरून व पुराव्याच्या आधारे सुनावणी केली.
आरोग्य विभागात नक्षल अतिदुर्गम भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त प्रोत्साहन भत्ता मासिक ६ हजार रुपये शासनाकडून मिळतो. एप्रिल २०१३ ते मार्च २०१४ या कालावधीकरिता भत्त्याचे ६ हजार रूपये मासिक दराने ७२ हजार रुपये मंजूर झाले होते. त्या बिलाचे १० टक्के ७ हजार २०० रुपये द्या; अन्यथा पुढचे बिल मंजूर करणार नाही. असे आरोपीने म्हटल्यामुळे त्यांनी त्याला लाच घेताना रंगेहाथ पकडून दिले होते.