लाखांदूर : लाखांदूरवरून बारव्हाकडे जात
असताना चिचोलीसमोरील नहराजवळील मुख्य रस्ता ओलांडण्याच्या नादात रानडुकराने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. धडकेत मोटारसायकलवर बसलेल्या एका महिलेसह अन्य दोन पुरूष असे तिघे जखमी झाल्याची घटना गुरुवार दि. ९ मार्च २०२३ ला सायंकाळच्या दरम्यान घडली. मोतीराम बाबूराव कुंभरे (४०), मीना मोतीराम कुंभरे (३३) व दिलीप बाबूराव कुंभरे (३८) तिघेही रा. सोनमाळा असे जखमींची नावे आहेत. तिघांना लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
मीना कुंभरे हिचे लाखांदूर हे माहेर असून आपल्या नातेवाईकांच्या भेटी घेतल्यानंतर पती व दिरासोबत आपल्या सासरी सोनमाळा येथे मोटारसायकलने सायंकाळी जात होती. चिचोलीपुढील नहराजवळ मुख्य रस्त्यावर रानडुकराने मोटारसायकलला जबर धडक दिली. यात तिघेही रस्त्यावर पडल्याने जखमी झाले. तिघांनाही लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.