खळबळजनक! सुनेच्या प्रियकराचा सासूवर बलात्कार


नागपूर : विवाहित प्रेयसीला घरी भेटायला आलेल्या प्रियकराने प्रेयसीसमोरच तिच्या सासूवर बलात्कार केला. ही धक्कादायक घटना मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी सुनेच्या प्रियकराला अटक केली. विनू (२८) असे नराधम आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनूचे गावातीलच एका तरुणीशी सूत जुळले होते. तिचे गावातील एका नातेवाईकाशी लग्न ठरले. त्यामुळे विनूने लग्न न करण्याचा निर्णय घेतला. प्रेयसी पतीसह गावातच सुखाने संसार करीत असल्याचे विनूला बघवत नव्हते. त्याला दारूचे व्यसन जडले. त्याने विवाहित प्रेयसीला पुन्हा आपल्याकडे आकर्षित केले. त्यामुळे लग्न झाल्यानंतरही पतीच्या नजरेआड ती विनूशी विवाहबाह्य संबंध ठेवत होती. त्या महिलेच्या घरात मूकबधिर सासू (४५) राहते. विनू अनेकदा सासूसमोरच प्रेयसीला घरात भेटायला येत होता.

विनूला भेटायला सासू नेहमी विरोध दर्शवत होती. परंतु, सून ही प्रेमसंबंध तोडायला तयार नव्हती. शेवटी मुलाचा संसार तुटू नये म्हणून ती विचार करीत होती. त्यामुळे सुनेची हिंमत वाढली. मूकबधिर सासूसमोरच सून आणि विनू हे दोघे घरात अश्लील चाळे करीत होते. ३ मार्च रोजी दुपारी तीन वाजता विनू हा प्रेयसीला भेटायला घरी आला. त्यावेळी तो दारूच्या नशेत होता. त्याने सुनेसमोरच मूकबधीर असलेल्या सासूवर बलात्कार केला. त्यावेळी सुनेने आरोपी विनूला कोणताही विरोध केला नाही.

रात्री आठ वाजता सासूने आपल्या पतीला घडलेल्या प्रकाराची खाणाखुणा करून माहिती दिली. त्यांनी सुनेला विचारपूस केल्यानंतर मौदा पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. आरोपी विनूला अटक केल्यानंतर त्याने प्रेमप्रकरणाची आणि केलेल्या कृत्याची कबुली दिली.