ताडीच्या झाडावरुन पडून इसमाचा मृत्यू
एटापल्ली तालुक्यात १५ दिवसात दुसरा बळी

 एटापल्ली : ताडाच्या झाडावर ताडी उतरविण्याकरिता चढलेल्या इसमाचा झाडावरुन पडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी एटापल्ली जवळील मरपल्ली येथे घडली. विशेष म्हणजे ताडाच्या झाडावरून पडून मृत्यू झाल्याची मागील १५ दिवसांतील ही दुसरी घटना आहे.

मुरा बोरा मडावी (५५) असे मृतकाचे नाव आहे. तो मागील काही दिवसांपासून ताडी काढत होता. ताडीच्या झाडाला बांधलेली हंडी उतरविण्यासाठी तो झाडावर चढला.

मात्र काही उंचावर चढल्यानंतर त्याचा तोल गेल्याने झाडावरून कोसळून त्याचा मृत्यू झाला. एटापल्ली तालुक्यात मोठ्या प्रमाणात ताडाची झाडे आहेत. जानेवारी महिन्यापासून ताडाच्या झाडातून रस निघण्यास सुरूवात होते. अनेक नागरिक ताडाचा रस पितात. विशेष म्हणजे घरातील प्रत्येक व्यक्ती रस पितात. त्यामुळे सकाळी व सायंकाळी रसाची हंडी झाडावरून उतरविली जाते. नागरिक कोणत्याही साधनांशिवाय झाडावर चढतात. अशातच दुर्घटना होऊन ते झाडावरून कोसळून मृत्युमुखी पडतात.