मोबाईलवर अश्लिल चित्रफित दाखवून विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला अटक
गोंदिया, : तालुक्यातील डांगोरली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता पाचवीत शिकत असलेल्या विद्यार्थिनींना मोबाईलवर अश्लिल चित्रफित दाखवून त्यांना छेडत विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला अखेर रावणवाडी पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव संजय अग्रवाल असे आहे.

सविस्तर असे की, गोंदिया तालुक्यात डांगोरली येथे जिल्हा परिषदेची हिंदी माध्यमाची शाळा आहे. या शाळेत इयत्ता पाचवीला शिकविण्याकरिता संजय अग्रवाल या शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. तो शिक्षक विद्यार्थिना शिकविण्याच्या बहाण्याने नको त्या भागाला स्पर्श करत होता. त्याचप्रकारे विद्यार्थिनींना मोबाइलवर अश्लिल चित्रफित दाखवत होता. या प्रकरणाची वाच्यता न करण्याची धमकी दिल्याची तक्रार शाळेतील 8

विद्यार्थिनींनी 20 फेब्रुवारी रोजी केली होती. याची माहिती त्या पिडीत विद्यार्थिनींनी पालक आणि मुख्याध्यापकाला दिली. त्यानंतर पालकांनी शाळेत जाऊन कारवाईची मागणी केली. दरम्यान मुख्याध्यापकांनी याची तक्रार गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे केली होती. गटशिक्षणाधिकारी यांनी चौकशी केली असता तक्रारीत सत्यता आढळून आली. त्यानंतर पालक आणि गटशिक्षणाधिकारी यांनी रावणवाडी पोलिसांत शिक्षक संजय अग्रवाल याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. या प्रकरणाचा तपास पोलिस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक अशोक बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली रावणवाडीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भुजबळ करत आहेत.