देसाईगंज :- तालुक्यातील फरी जंगल परिसरात एका बैलाची शिकार झाली असल्याची घटना आज १७ मार्च रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली आहे. मात्र नेमकी शिकार वाघाने केली वा बिबट्याने केली; कळू न शकल्याने संभ्रम निर्माण झाले आहे.
सविस्तर वृत्त असे की, काल १६ मार्च रोजी फरी गावातील गुराखी देवचंद पेंदाम हे नेहमी प्रमाणे गायी - ढोरे चराई करीता फरी जंगल परिसरात गेले होते. मात्र त्याच गावातील पांडुरंग आसाराम शेंडे यांच्या मालकीचे बैल घरी परत आले नसल्याने त्यांनी व गावातील नागरिकांनी शोधाशोध केला. मात्र त्यादिवशी त्यांना बैलाचा थांगपत्ता लागलेला नाही. परत पुन्हा दुसऱ्या दिवशी म्हणजे आज १७ मार्च रोजी फरी जंगल परिसरात शोधाशोध केल्याने आज दुपारच्या सुमारास बैलाची शिकार झाले असल्याचे आढळून आले.
फरी गावातील पांडुरंग आसाराम शेंडे यांच्या मालकीचे असलेल्या बैलाची शिकार झाल्याची माहिती वनक्षेत्र सहाय्यक के. वाय. कऱ्हाडे यांना देण्यात आली. माहिती मिळताच कऱ्हाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळावरून बैलाची शिकार वाघाने केली वा बिबट्याने केली कळू न शकल्याने सदर घटनास्थळी कॅमेरा लावून छायाचित्रावरून कळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. वनक्षेत्र सहाय्यक कऱ्हाडे यांनी सदर घटनेचा पंचनामा केला असून घटनास्थळावरून पाहणी केल्यानंतर वाघाने शिकार केली असावी, असा अंदाज वर्तविण्यात येत असल्याची माहिती दिली.