प्रेयसीला पळवून नेताना प्रियकराचा मृत्यू


प्रेयसीला पळवून नेताना प्रियकराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना छत्तीसगड राज्यातील कोंडागाव येथे घडली.

प्रेयसीला पळवून नेताना प्रियकराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना छत्तीसगड राज्यातील कोंडागाव येथे घडली. कोंडागाव जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला मोटारसायकलने धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू झाला तर तरुणी गंभीर जखमी झाली. तरुणीवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत तरूण आणि जखमी तरुणी प्रेमी युगुल होते व घरातून पळून जात असल्याचे सांगितले जात आहे.राजकुमार यादव (वय २१ ) असे मृत तरुणाचे नाव असून निलय पोयाम (वय २४) जखमी तरुणीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोंडागाव जिल्ह्यातील बनियागावमधील निलमवर कोंडागाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिने सांगितले की, तिचे पलारी गावातील राजकुमार यादव या तरुणावर प्रेम होते. सोमवारी रात्री राजकुमार यादव निलमला घेण्यासाठी दुचाकीवरून बनियागाव येथे आला होता. तेथून दोघेही दुचाकीने पलारी गावाकडे निघाले असता राष्ट्रीय महामार्ग ३० वर उभ्या असलेल्या ट्रकवर मोटारसायकल आदळली. या धडकेत राजकुमारच्या डोक्याला जबर मार लागून तो जागीच ठार झाला.  

जखमी निलम हिने दिलेल्या माहितीनुसार, राजकुमार तिला घरातून घेण्यासाठी आला होता. घरातील सदस्यांचा डोळा चुकवून ती पळून जात असताना हा अपघात झाला व एका प्रेमकहाणीचा करुण अंत झाला.