नागपूर: शिव, फुले, शाहू, आंबेडकर व्यक्ती नसून एक सामाजिक विचारधारा असल्यानेच बहुजन महापुरूषांच्या विचारांचा प्रसार-प्रचार महत्वाचा आहे असे आवाहन ज्येष्ठ इतिहासकार मा.म.देशमुख यांनी केले. ईव्हीएम भंडाफोड राष्ट्रव्यापी परिवर्तन यात्रा कन्याकुमारी ते कश्मीर पार्ट-२ मध्ये नागपूर येथील आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
ते म्हणाले, देशात बुद्धांपासून ते डॉ. आंबेडकर यांच्यापर्यत सर्व मूलनिवासी बहुजन महापुरुषांनी समाजाच्या कल्याणासाठी व हितासाठी काम केलेले आहे. आज आपल्या देशात परिस्थिती खूप चांगली आहे. आज ब्राम्हणवादी पिलावळही एकमेकांत भांडत आहेत. पण आपलीच बहुजन बांधवांची ताकद व शक्ती विखुरलेली आहे. मी स्वत: ओबीसी कुणबी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मावळा आहे. मी महत्वाच्या विषयावर बोलणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांना मानणारा एक मावळा आहे. मूलनिवासी बहुजन महापुरुषांच्या विचारधारेला मानून काम करणारे लोक या देशात तयार झाले पाहिजेत. कारण ब्राम्हणी विचारधारेच्या विरोधात काम करणारे विद्रोही लोक बहुजन समाजात निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी ओबीसी, एससी आणि एसटी आणि मायनॉरिटीच्या लोकांनी पुढे येवून बहुजन विचारधारेचे काम करणे जरुरीचे आहे. म्हणून एकजुटीने राहणे गरजेचे आहे.
युके, कॅनडा आणि अमेरिकेमध्ये मोठ्या संस्थानांमध्ये दीड लाख बहुजन मुले व मुली शिक्षण घेत आहेत. अमेरिकेतल्या त्या शिक्षण संस्थांमध्ये फक्त १० हजार भारतातील भट, ब्राम्हण शिक्षण घेत आहेत. अमेरिकेसारख्या मोठ्या देशात राहिलेला बाकीचा सगळा मूलनिवासी बहुजन समाज उच्च शिक्षण घेत आहे. भारतात चातुवर्ण व जातीयव्यवस्था आहे, तर भारत सोडून जगभरात ब्राम्हणी व्यवस्था व जातीयव्यवस्था नाही. कारण अमेरिकेसारख्या देशांमध्ये गरिब व श्रीमंत वर्ग आहे. पण या देशात कोणतीही जातीय,धार्मिक, चातुवर्ण व्यवस्था नाही. विदेशात शिकणारे मूलनिवासी बहुजन तरुणांमध्ये काही चमचे व दलाल निर्माण होतील, परंतु त्यांच्यामधील काही तरुण समाजासाठी काम करतील. पण त्यामध्ये एक डॉ. बाबासाहेब आंबेडकर निर्माण झाला, तरी देशाचे कल्याण व हित केल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी उच्च शिक्षण घेणे गरजेचे असल्याचे मत मा.म.देशमुख यांनी व्यक्त केले.
देशातील हजारो तरुण आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच जगभरातल्या अनेक देशांत उच्चशिक्षण घेत आहेत. दुबईसारख्या मुस्लिम देशांमध्येही ते शिकत आहेत. तेथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करत आहेत. इग्लंडसारख्या ख्रिश्चन देशांमध्ये मी ऑनलाइन भाषण दिले आहे. तर जगभरातील अनेक ख्रिश्चन देशांमध्ये शिवजयंती व शिवव्याख्याने आयोजित केली जात असल्याची माहिती मा.म.देशमुख यांनी दिली.
देशात मूलनिवासी बहुजन महापुरुषांची विचारधारा पसरवणे गरजेचे आहे. कारण ती विचारधारा खूप मोठी आहे. आपण देशातील ब्राम्हणवादी विचारांना विरोध करणारे विद्रोही लोक आहोत. या ब्राम्हणवादी विचारधारेला विरोध केलाच पाहिजे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे. देशात विभूती पूजा नको तर, विचार महत्वाचे आहेत. बहुजन बांधवांनी महापुरुषंाच्या विचारधारेने जीवन जगले पाहिजे. आचरण केले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर केवळ व्यक्ती नसून एक सामाजिक विचारधारा आहे. हे महापुरूष आयुष्यभर ब्राम्हणवादी विचारधारेच्या विरोधात लढले आहेत आणि त्यांनी मोठा संघर्ष केला आहे. त्यांची विचारधारा विद्रोही आहे. म्हणून त्यांच्या विचारधारेला अनुसरुनच जीवन जगले पाहिजे, संघर्ष करणे गरजेचे आहे. ब्राम्हणवादी विचारधारेचा त्याग केला पाहिजे. त्यांच्याविरोधात बोलले पाहिजे.
बहुजन समाजावर होत असलेल्या अन्याय व अत्याचाराच्या विरोधात लढणे व बंड पुकारणे हे ऐतिहासिक कार्य हे बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम करत आहेत. देशातील बहुजन समाजासाठी, कल्याणासाठी, हितासाठी रात्रंदिवस वामन मेश्राम संघर्ष करत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली बहुजन महापुरुषांच्या विचारधारेचे मोलाचे काम सुरु आहे. ओबीसी, एससी, एसटी, आणि मायनॉरिटीमध्ये जनजागृतीचे काम करत आहेत. त्यासाठी आपण सहकार्य करण्याची गरज असल्याचे देशमुख यांनी सांगितले.