राहाता / नगर : काही महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह केलेल्या पतीने आपल्या १९ वर्षीय पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्या पोटात चाकू खूपसून खून केला. पत्नीचा खून केल्यानंतर आरोपी पतीने विष प्राशन केले असून, त्यास लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. ही खळबळजनक घटना साकुरी गावात घडली.
याप्रकरणी मयत मुलीचे वडील सुखदेव बाळासाहेब नागरे (४५) यांनी राहाता पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. त्यात म्हटले आहे, माझी मुलगी सविता व पिंपळस येथील मुलगा सनी उर्फ सुनील शिवाजी ससाणे यांचे प्रेमसंबंध होते. त्यामुळे मी त्यांचा आंतरजातीय विवाह वर्षापूर्वी लावून दिला होता. मुलगी व जावई दोघेही साकुरी शिवारातच बरबट यांच्या वस्तीवर मोलमजुरी करून त्यांची उपजीविका भागवत होते. लग्नानंतर तीन महिन्यांतच मुलगी सविता हिला तिचा पती सुनील संशयावरून सारखी मारहाण करत असे. ही बाब मुलीने वडिलांना सांगितली होती. त्यानंतर नागरे यांनी जावई सनी उर्फ सुनील ससाणे यास मुलीवर संशय घेऊ नकोस तिला मारहाण करून दमदाटी करू नकोस, असे वारंवार सांगितले. मात्र, त्याच्या वर्तनात कुठलाही बदल झाला नाही. मुलगी सविताच्या पोटावर रक्त आढळले व तिचे उजव्या हाताजवळ छोटासा चाकू दिसून आला. सविता तेथे मृत अवस्थेत तर सुनील दाजी यांचे हातात चाकू दिसला व ते मला पाहून बाहेर पळाले. असे मयतच्या बहिणीने सांगितले. माझी मुलगी सविता हिचे चारित्र्यावर संशय घेऊन तिच्या पोटात चाकू मारून तिचा खून केल्याची फिर्याद वडील सुखदेव नागरे यांनी पोलिसात दिली.