मोबाइल हातात असल्याशिवाय मुलं जेवतच नाहीत? वापरा या ५ टिप्स..🫵🏻 तुमची मुलं अधिक वेळ स्मार्टफोनवर घालवत असतील, किंवा मोबाईल बघत जेवण्याची सवय लागली असेल तर वेळीच सावध व्हा.. मुलांची मोबाईलची सवय बदलण्यासाठी या सोप्या टिप्स आजमावून पाहा..

👉🏻 *१. मुलांना होणाऱ्या नुकसानाविषयी माहिती द्या :-* फोनच्या अतिवापरामुळे किंवा सतत फोन वापरल्याने कोणत्या प्रकारचे नुकसान, हानी होऊ शकते, याची जाणीव मुलांना करुन द्या. वारंवार फोन वापरत असल्यामुळे होणाऱ्या नुकसानाबद्दल किंवा होणाऱ्या हानी बद्दल मुलांना योग्य ती माहिती द्यावी. कदाचित आपण मुलांना फोनच्या अतिवापरामुळे होणारी हानी कोणती हे सांगितल्यानंतर ते फोनचा वापर कमी करतील. यासोबतच पालकांनी मुलांना हे देखील सांगायला हवे की, फोन बघत बघत जेवण जेवल्याने त्यांचे डोळे, त्वचा आणि आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. मुलांना फोनमुळे होणारे नुकसान किंवा हानी सांगताना त्यांना ओरडू नका. मुलांनी फोन बाजूला ठेवल्यानंतर त्यांना प्रेमाने समजावून सांगण्याचा प्रयत्न करा.

👉🏻 *२. जेवणाची वेळ निश्चित करावी :-* आपल्या मुलांसाठी जेवणाची एकच ठराविक वेळ निश्चित करावी. जर आपण मुलांना जेवण्याची एकच वेळ निश्चित केली तर त्या वेळात मुलांना केवळ जेवणावरच लक्ष केंद्रित करण्यास शिकवावे. जर आपण मुलांना फोन बाजूला ठेवून ठरवलेल्या वेळेनुसार जेवणाला देऊन, किमान त्या वेळात मोबाईल वापरण्याची परवानगी दिली नाही, ता यामुळे मुलांचे जेवताना फोन पहात जेवणे या गोष्टीला सहज आळा बसू शकतो. आपण मुलांना जेवताना फोन वापरू देऊ नका आणि त्यासाठी त्यांच्या मागे धावण्याऐवजी त्यांना खाण्यासाठी एक निश्चित वेळ द्या आणि त्यांचे सातत्याने पालन करण्यास सांगा. असे केल्याने मुलांचे पूर्ण लक्ष जेवणाकडे असेल आणि ते फोन वापरणार नाहीत. मुलं खात असताना त्यांच्या आसपास कोणत्याही प्रकारचे गॅजेट नसावे, याची खबरदारी पालकांनी घेणे गरजेचे आहे. जर आपल्या मुलांनी जेवताना फोनचा आग्रह धरला तर आपण त्याला एक खेळण देऊ शकता म्हणजे मुलं किमान त्या गॅजेटने खेळणे काही काळासाठी तात्पुरते विसरुन जाईल.

👉🏻 *३. मुलांना सगळ्यांसोबत जेवायला बसवा :-* सध्याच्या धावपळीच्या जगात आपल्याला एकमेकांसोबत किंवा संपूर्ण कुटुंबासोबत एकत्र जेवायला बसायला वेळच मिळत नाही. जर आपण दिवसातून एकदा आपल्या संपूर्ण कुटुंबासह आणि मुलांसोबत एकत्रित जेवण केले तर मुलांना मनोरंजनासाठी कोणत्याही गॅजेट्सची गरज भासणार नाही. अशा परिस्थितीत मुलं कुटुंबांशी संवाद करता करता जेवतील, अशावेळी आपल्या मुलांना फोनची गरज भासणार नाही.

👉🏻 *४. मुलांसमोर ठेवा उदाहरण :-* मुलं ही नेहमी आईबाबांचं अनुकरण करत असतात. जसं वातावरण घरात असेल त्याचप्रमाणे मुलंही वागत असतात. जर आपण वृत्तपत्र किंवा पुस्तक वाचताना त्यांना दिसलात तर त्यांनाही वाचनाची गोडी लागेल. आपणच जर त्यांच्यासमोर सतत मोबाईल पाहत जेवताना दिसलात तर त्यांनासुद्धा नक्कीच सवय लागेल.

👉🏻 *५. मोबाईल पाहण्याची वेळ ठरवा :-* मोबाईल पूर्णतः वापरणे बंद न करता मुलांची मोबाईल पाहण्याची वेळ ठरवा. जर त्यांना शाळेतून आल्यावर मोबाईल पाहायचा असेल तर त्यांना तसं करू द्या. परंतु सलग काही तास मोबाईल मुलांच्या हातात देणे टाळा. मुलांसाठी नियम लागू करा आणि स्वतः ते नियम नक्की फॉलो करा. लक्षात ठेवा बरेचदा मुलं आईबाबाचं अनुकरण करतात. कधीतरीच त्यांना या नियमातून सूट द्या.