चामोर्शी : चामोर्शी तहसील कार्यालयातून मुरुमासाठी १०० ब्रासची रॉयल्टी काढायची अन् ४०० ते ५०० ख़ास मुरुम खोदून शासनाचा महसूल बुडवायचा. दिवस-रात्र मुरुमाची अवैध वाहतूक जोमात करायची, असा अवैध प्रकार शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात काही दिवसांपासून सुरू आहे. या अवैध प्रकारामुळे शासनाचा महसूल बुडत असतानाही अवैध तस्करांवर कारवाई होत नाही, संबंधित विभागाचे अधिकारी कुंभकर्णी झोपेत तर नाही ना? असा प्रश्न सुज्ञ नागरिक उपस्थित करीत आहेत.
चामोर्शी शहरात व तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणची १०० ब्रासची रॉयल्टी काढून ४०० ते ५०० ब्रास मुरुमाचे खनन करून मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जात आहे; परंतु वाहतूक सुरू असतानाही प्रशासनाकडून कोणत्याही ट्रॅक्टरची किंवा रॉयल्टीची तपासणी केली जात नाही. परवानगीपेक्षा अधिकच्या
मुरुमाचे खनन होत आहे. यास जबाबदार कोण, असा प्रश्न सुद्धा नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे संबंधित विभागाने महसूल परवाना मिळवलेल्या जागेची पाहणी, ट्रॅक्टरची तपासणी, रॉयल्टी चेक करावी. तेव्हाच अवैध खननाला चाप बसेल, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.
.परवानगी एका जागेवर, खोदकाम दुसरीकडे?
महसूल प्रशासनाकडून मुरुम खोदकामासाठी विशिष्ट जागेची परवानगी दिली जाते; मात्र त्या जागेची कुठल्याही प्रकारची पाहणी केली जात नाही. परिणामी अनेक कंत्राटदार परवानगी नसलेल्या ठिकाणचेही मुरुम खोदतात. शासकीय सुट्टीच्या दिवशी तसेच सूर्योदयापूर्वी व सूर्यास्तानंतरही मुरुम खनन करून वाहतूक केली जाते; मात्र त्यावर कारवाई केली जात नाही, असा आरोपही नागरिकांकडून होत आहे.