पोलिस व गाव संघटनेच्या महिलांची कारवाई
कुरखेडा : तालुक्यातील पळसगड ग्रामपंचायतींतर्गत येणाऱ्या तीन गावांतील दारू विक्रेत्यांच्या घरावर व अड्ड्यांवर धाडी टाकून ३३ हजारांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. ही कारवाई पुराडा पोलिस, मुक्तिपथ तालुका चमू व गाव संघटनेच्या महिलांनी संयुक्तरीत्या केली.
पळसगड येथे गाव संघटना व मुक्तिपथ यांच्या माध्यमातून दोन दारू विक्रेत्यांकडील २ मोठे मडके मोहसडवा, चालू भट्टी, देशी दारूचे ६४ टिल्लू व इंग्लिश दारूच्या निपा २१, असा एकूण १३ हजार रुपयांचा माल नष्ट केला.
तसेच धानोरी व शिकारी टोला येथे विविध ठिकाणी धाडी टाकल्या. त्यात १० मोठे मडके मोहसडवा, रिकामे मडके, तसेच चालू भट्ट्या व मोहाची दारू काढण्याची भांडी, असा एकूण २० हजार रुपयांचा माल नष्ट करण्यात आला.
दोन्ही ठिकाणांहून एकूण ३३ हजारांचा मुद्देमाल नष्ट करून दारूविक्री न करण्याबाबत तंबी दिली. ही कारवाई प्रभारी अधिकारी भूषण पवार यांच्या नेतृत्वात एएसआय मडकाम, नापोशि जुमनाके, अतकरे, भाग्यश्री डोंगरे तसेच मुक्तिपथतर्फे मयुर राऊत, विनोद पांडे व कान्होपात्रा राऊत आदींनी केली.