एकलपूर ग्रामपंचायतच्या सरपंच संध्या नागमोती अखेर पायउतार


देसाईगंज : एकलपूर ग्रामपंचायतच्या सरपंच संध्या नागमोती यांच्या विरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी विकास कामात कुटुंबाचे हितसंबंध असल्याचा ठपका ठेवत जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने तहसीलदार संतोष महले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित विशेष बैठकीत सरपंच नागमोती यांच्या विरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी एकमताने अविश्वास ठराव पारित केला आहे.

एकलपूर ग्रामपंचायतच्या सदस्यांनी गडचिरोली जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी यांच्याकडे सरपंच संध्या नागमोती यांच्याविरोधात अविश्वास ठराव घेण्यासंदर्भात विशेष सभेचे आयोजन करण्याची मागणी केली होती. त्याअनुषंगाने एकलपूर ग्रामपंचायत सभागृहात तहसीलदार महले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या अविश्वास ठरावाबाबत सदस्यांनी आपली बाजू मांडली. ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांनी सरपंच नागमोती यांच्या विरोधात बाजू मांडताना स्पष्ट केले की, सरपंच नागमोती या ग्रामसभा किंवा मासिक सभेत मंजूर झालेल्या ठरावाची अंमलबजावणी न करता स्वतःच्या मर्जीने किंवा पतीला विचारून ग्रामपंचायतचा कारभार चालवतात. सभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे उत्तर न देता खोटी व चुकीची माहिती देत होत्या.

दरम्यान ठरावाच्या विरोधात कोणीही मतदान केले नसल्याने सरपंच संध्या नागमोती यांच्या विरोधात ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ५४ (५) (३) नुसार सहा विरुद्ध शून्य अशा बहुमताने अविश्वास ठराव पारित करीत असल्याचे तहसीलदार संतोष महले यांनी जाहीर केले. सरपंच नागमोती गैरहजर होत्या. ठरावाच्या वेळी ग्रामपंचायत सदस्य वनश्री विष्णू भागडकर, विजय बाबुराव सहारे, ज्ञानदेव नानाजी पिलारे, देवनाथ सयाम, सारिका आनंदराव रामटेके प्रामुख्याने उपस्थित होत्या.