मेट्रोप्रमाणे रेल्वेही उन्नत मार्गाचा पर्याय शोधतेय! इतवारी-नागभीड, वडसा-गडचिरोली उन्नत रेल्वेमार्ग


नागपूर : शहारातून धावणारी मेट्रो जागेअभावी भुयारी किंवा उन्नत मार्गावर धावण्याचा पर्याय मेट्रो व्यवस्थापनाने स्वीकारला आहे. वनसंपदा आणि वन्यप्राणी यामुळे रेल्वेने उन्नत मार्गाचा पर्याय शोधला आहे. इतवारी ते नागभीड आणि वडसा ते गडचिरोली रेल्वेमार्गावर वनखात्याचा अडसर असल्याने येथे उन्नत मार्ग टाकण्यात येणार आहे.

इतवारी ते नागभीड या ११० किलोमीटर रेल्वेमार्गाचे काम झाले आहे. महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. (महारेल) हे काम करीत आहे. उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातून हा रेल्वेमार्ग जात आहे. त्यामुळे वनखात्याने काम अडवून ठेवले आहे. त्यावर उपाय म्हणून रेल्वेने जंगलातील १६ किलोमीटरचे मार्ग उन्नत करण्याचा निर्णय घेतला आहे. महारेलने सुधारित आराखडा सादर केला आहे. अशाच प्रकारे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला वडसा ते गडचिरोली नवीन रेल्वे मार्गावर १८ ते २० किलोमीटर उन्नत मार्ग उभारण्यात येणार आहे.

मेट्रोप्रमाणे रेल्वेही काही किलोमीटर उन्नत मार्गावर धावू शकणार आहे. यामुळे प्रकल्पाची किंमत वाढेल, पण वनखात्याचा अडसर दूर होईल आणि वन्यप्राण्यांचा भ्रमणमार्गही अबाधित राहू शकणार आहे. राज्य सरकारने वडसा-गडचिरोली या मार्गाला २०१५ मध्ये मंजुरी दिली. त्यासाठी ४०१ कोटी रुपये मंजूरदेखील केले. पण त्याचे काम अद्याप सुरू होऊ शकले नाही.

वडसा-गडचिरोली या ४९.५ कि.मी. रेल्वे मार्गासाठी खासगी, तसेच वनखात्याची जमीन आवश्यक आहे. गडचिरोली उपविभागातील आठ गावांतील ४५.७६ हेक्टर खासगी जमीन अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर सुमारे १८ ते २० किलोमीटरचा रेल्वे मार्ग वन जमिनीवरून जाणार आहे. येथे वन्यप्राणांना अडथळा निर्माण होऊ नये म्हणून १८ ते २० किलोमीटरचा मार्ग उन्नत करण्यात येणार आहे, अशी माहिती दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मनिंदरसिंग उप्पल यांनी दिली.