पन्नास खोके एकदम ओके म्हणाल तर खबरदार – उच्च न्यायालयाची ठाकरे राऊतांना तंबी


महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात 20 जुन 2022 ही तारीख अजरामर ठरली असुन महाराष्ट्र विधानपरिषदेची निवडणुक पार पडताच तत्कालीन मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ह्यांना गुंगारा देत तत्कालीन महसूलमंत्री तथा शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे ह्यांनी 13 आमदारांसह आपला बालेकिल्ला असलेल्या ठाणे मार्गे गुजरातच्या सुरत येथे तळ ठोकत आपल्याच महाविकास आघडीविरुद्ध उठाव करत बंडाचा झेंडा फडकावला. दरम्यान हादरलेल्या शिवसेना नेत्यांनी उर्वरित आमदारांना आपल्या गोटात ठेवण्यासाठी जंग जंग पछाडले मात्र पुढील काही दिवसातच एकनाथ शिंदे ह्यांच्या कंपुत 40 आमदार व तत्कालीन मंत्र्यांनी प्रवेश करून उद्धव ठाकरे सरकारला अल्पमतात आणले.

झालेल्या घटनाक्रमाने बिथरलेल्या संजय राऊत ह्यांनी उठाव करणाऱ्या आपल्याच पक्षाच्या आमदारांवर प्रत्येकी 50 खोके म्हणजेच 50 कोटी रुपयांची रक्कम घेऊन पक्षविरोधी कारवाई केल्याचा आरोप केला. संजय राऊत एवढ्यावरच थांबले नाही तर शिंदे ह्यांचे समर्थन करणाऱ्या स्वपक्षीय महिला आमदारांना वेश्या म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली. शिंदे आपल्या समर्थक नेत्यांसह पुढे गुवाहाटी येथे पोहचले. त्यावेळी राऊत ह्यांनी कामाख्या देवीला ह्या आमदारांचा बळी देणार असल्याचेही विधान केले तर महाराष्ट्रात ह्या चाळीस आमदारांचे मृतदेह परत येतील अशा प्रकारचे अत्यंत घृणास्पद विधान देखिल केले. गुवाहाटी येथुन शिंदे समर्थक आमदार गोवा मार्गे मुंबईत दाखल झाले. दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर महाराष्ट्रात आल्यावर भाजपाच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले.

एकनाथ शिंदे ह्यांनी आपण पक्षांतर केले नसुन आपणच खरी शिवसेना असल्याचे वारंवार सांगितले मात्र तरीही उद्धव ठाकरे गट त्यांना गद्दार ह्या विषेषणाने हिणवत होते. अखेरीस निवडणूक आयोगाने दोन्ही गटांचे पुरावे तपासून व कायदेशीर तरतुदींचा अभ्यास करून एकनाथ शिंदे ह्यांच्या गटाला शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह बहाल करून शिंदे ह्यांच्या दाव्याला पुष्टी दिली. मात्र तरीही समाज माध्यम असो, जाहीर सभा असो, मुलाखती असो वा विधिमंडळाचे सभागृह उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यासह ठाकरे गटाचे व महाविकास आघाडीचे नेते शिंदे गटाला गद्दार तसेच पन्नास खोके एकदम ओके अशा घोषणा देऊन हिणवत होते.


ठाकरे गटाने दिलेल्या या घोषणेमुळे आता त्यांच्याच अडचणी वाढल्या आहेत. हायकोर्टाने या प्रकरणी त्यांना सुनावलं आहे. “५० खोके एकदम ओक्के” हे शिवसेनेच्या आमदारांविरोधात केलेले वक्तव्य तात्काळ सोशल मीडियातून काढून टाकावे, असे आदेश दिल्ली हायकोर्टाने ठाकरे गटाला दिले आहेत.

एकनाथ शिंदे यांनी २००० कोटी देऊन निवडणूक आयोगाकडून चिन्ह खरेदी केलं. ५० कोटी देऊन आमदार खासदारांना विकत घेतले. “…शिवसेनेतून घाण निघाली आहे…” आणि “50 खोके एकदम ओके” अशा अनेक विधानांवर कोर्टाने आक्षेप नोंदवला आहे आणि ते सोशल मीडियातून हटवण्याचे आदेश दिले आहेत.

शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी या प्रकरणी मानहानीचा खटला दाखल केला होता. या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना समन्स बजावलं आहे. संजय राऊत यांनाही या खटल्यात समन्स बजावलं असून १७ एप्रिल रोजी पुढची सुनावणी होणार आहे.