आंधळी नवरगाव येथील घटना
दिनेश बनकर कार्यकारी संपादक
कुरखेडा - दारूच्या नशेत पत्नीशी नेहमी भांडण करणाऱ्या घरजावयाला वैतागून आजी सासूने घर सोडून निघून जाण्यास बजावले. त्यामुळे संतापलेल्या घरजावयाने धारदार चाकूने आजी सासूवर हल्ला करीत तिचा गळा चिरल्याची घटना बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास कुरखेडा तालुक्यातील आंधळी (नवरगांव) येथे घडली.
लीलाबाई मडकाम असे जखमीचे नाव आहे. तिच्यावर गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत. सुनील कुमराज शेंडे (२८) रा. लेंढारी असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर कुरखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. आज गुरूवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाच्या निर्देशानुसार त्याची दोन दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली.
लीलाबाई मडकाम ही आंधळी येथे एकटीच राहत असल्याने तिला आधार देण्याकरीता मागील काही दिवसापासून नातजावई असलेला सुनील शेंडे व नातीन करिश्मा हे पतीपत्नी आजीकडेच राहत होते. सुनीलला दारूचे व्यसन असल्याने तो दररोज दारू प्राशन करीत पत्नी
करिश्मा सोबत भांडण करीत होता. या भांडणाला वैतागून आजी लीलाबाई यांनी २८ मार्चला सुनीलला घर सोडून आपल्या गावी निघून जाण्यास बजावले. त्यानुसार आपले सामान घेत सुनील आपल्या गावी लेंढारी येथे निघून गेला होता. मात्र बुधवारी रात्री ११ वाजता तो पुन्हा आंधळी येथे परत आला व घरी पोहचत दार ठोठावले. यावेळी त्याच्या पत्नीने दार उघडले. सुनील दिसताच लीलाबाई यांनी त्याला घरातून निघून जाण्यास सांगितले. या रागाच्या भरात सुनीलने लीलाबाई यांच्यावर हल्ला चढवून त्यांच्या गळ्यावर वार केला. त्यामुळे लीलाबाई जखमी झाल्या. पत्नीने आरडाओरड केल्यानंतर सुनील तिथून पळून गेला. जखमी लीलाबाई यांना कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान कुरखेडा पोलिसांनी भादंवी कलम ३०७, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करून सुनीलला अटक केली. न्यायालयाने सुनीलला दोन दिवसांच्या पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अधिक तपास पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक शितल माने करीत आहेत.