आंतरराष्ट्रीय समाजकार्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजनसमाजकार्याच्या आजी माजी विद्यार्थ्यांचा पुढाकार

चंद्रपूर: २१ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय समाजकार्य दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी विविध कार्यक्रमाचे आयोजन सुशीलाबाई रामचंद्रराव मामीडवार समाजकार्य महाविद्यालय पडोली चंद्रपूर येथे प्राचार्य डॉ. सुनील साकुरे यांच्या मार्गदर्शन व नियंत्रणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. .

महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी पर्यावरण मित्र संस्थेचे अध्यक्ष विजय देठे, समुपदेशक नागेश मादेशी,महाराष्ट्र सायकल भ्रमंती करणारी कु.प्रणाली चिकटे, यांनी केलेल्या कार्याबद्दल विशेष सत्कार व अनुभव कथन कार्यक्रम घेण्यात आला. तसेच महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी राजेश हजारे,राममिलन सोनकर, संदिप सुखदेवे, राणी खडसे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना या प्रसंगी मोलाचे मार्गदर्शन केले.या प्रसंगी मंचावर अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील साकुरे , उपप्राचार्य प्रा.नरेंद्र टिकले, माजी विद्यार्थी संघटना उपाध्यक्ष प्रा. डॉ.संजीव निंबाळकर व माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

या प्रसंगी विद्यार्थ्यांसाठी युवा संसद,निबंध स्पर्धा,पोस्टर प्रदर्शन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा,एकल व समूह नृत्य स्पर्धा चे आयोजन करण्यात आले.विजेत्या स्पर्धकांना आकर्षक सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन अनिकेत दुर्गे यांनी तर आभार युवराज बांबोळे यांनी मानले. बक्षीस वितरण प्रसंगी मंचावर उपप्राचार्य प्रा.नरेंद्र टिकले,सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. जयश्री कापसे,विद्यार्थी प्रतिनिधी स्वप्नील मेश्राम,निखिल भडके यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयोजन समितीच्या सर्व सदस्यांनी महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापक वृंदांच्या मार्गदर्शनात अथक परिश्रम घेतले.