तरुणीवर बलात्कार केल्यानंतर केलं मित्रांच्या हवाली, एकामागोमाग 8 जणांनी...


Crime News: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) एका घटनेने सध्या खळबळ माजली आहे. कानपूर (Kanpur) येथे एका तरुणीला ब्लॅकमेल करत तिच्यावर सामूहिक बलात्कार (Gangrape) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेत आहेत. आरोपी तरुणाने सर्वात प्रथम इन्स्टाग्रामच्या (Instagram) माध्यमातून पीडित अल्पवयीन तरुणीशी मैत्री केली होती. यानंतर त्याने तिचा अश्लील व्हिडीओ तयार करत त्याच्या माध्यमातून ब्लॅकमेल (Blackmail) करत बलात्कार केला. या घटनेत इतर सात आरोपीही सहभागी असून पोलिसांनी त्यांच्या विरोधातही गुन्हा दाखल केला आहे.

पीडित तरुणीचे आई-वडील डॉक्टर आहेत. तरुणी एकुलती एक मुलगी असून कानपूरमध्ये राहणाऱ्या विकास ठाकूर नावाच्या तरुणाशी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून मैत्री केली होती. विकासने तरुणीच्या फोटोच्या सहाय्याने तिचे काही अश्लील व्हिडीओ तयार केले होते. या व्हिडीओची भीती दाखवत विकास ठाकूर तिला धमकावत होता. या भीतीने तरुणी कोटाला निघून गेली होती. तरुणी पुन्हा घरी परतल्यानंतर आरोपी फोन करुन तिला धमकावू लागला होता. 

"...तर व्हिडीओ व्हायरल करुन टाकेन"
जर तू आली नाहीस तर मी व्हिडीओ व्हायरल करुन टाकेन अशी धमकी आरोपीने तरुणीला दिली होती. यानंतर पीडित तरुणी त्याला भेटण्यासाठी पोहोचली होती. यावेळी त्याने तिला बेशुद्ध केलं आणि बलात्कार केला. यानंतर त्याने कारमधून तरुणीला एका निर्जनस्थळी नेलं. तिथे त्याच्या दोन मित्रांनीही तिच्यावर बलात्का केला. नंतर आणखी पाच जण आले आणि तरुणीच्या शरिराचे लचके तोडले. 

मारहाण होत असल्याने तरुणीने आरडाओरड सुरु केली असता लोक जमू लागले. यानंतर आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला. घटनास्थळी जमलेल्या लोकांनी तरुणीची माहिती घेतली आणि तिच्या कुटुंबाला कळवलं. आई-वडिलांनी सगळा घटनाक्रम समजून घेतल्यानंतर पोलिसांकडे तक्रार केली. 

आरोपीने आपल्या शरिरावर ब्लेडने आपलं नाव लिहिलं आहे असंही तरुणीने सांगितलं आहे. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी विकास ठाकूरसहित इतर आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत.