75 वर्षांचा वर-70 वर्षांची वधू...म्हणून दोघांनी सत्तरीनंतर लग्नाच्या बोहल्यावर चढण्याचे ठरवले




रणबीर कपूरच्या ‘ये जवानी है दिवानी’ चित्रपटात एक डायलॉग आहे.

“22 तक पढाई, 25 पे नोकरी, 26 पे छोकरी, 30 पे बच्चे, 60 पे रिटायरमेंट और फिर मौत का इंतेजार. धत्.. ऐसी घिसी पिटी लाईफ थोडी जिना चाहता हूं..”

हा संवाद ऐकायला छान वाटत असला तरी अनेकांना प्रत्यक्षात विविध कारणांमुळे अशीच जीवनशैली स्वीकारावी लागते.

त्यातही वृद्धापकाळात व्यक्तीच्या जीवनातील एकटेपणामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम झाल्याची अनेक प्रकरणे आपल्या डोळ्यासमोर येतात.

उतार वयात प्रेम-लग्नाच्या हेतूने जोडीदार शोधणं, हे आजही आपल्या समाजात एखादा ‘टॅबू’ किंवा निषिद्ध असल्यासारखं आहे.

सामाजिक दबावाला बळी पडल्यामुळे अनेक वृद्ध व्यक्ती एकटेपणाचं आयुष्य जगण्याचा पर्याय निवडतात. अखेरीस, ‘मौत का इंतेजार’ मध्ये त्यांचं उर्वरित आयुष्य निघून जातं.

पण, कोल्हापूरच्या या आजी-आजोबांसारखेही काही जण आहेत, जे वेगळी वाट चोखाळण्यास मागचा पुढचा विचार करत नाहीत.

त्यामुळेच वयाच्या सत्तरीत लग्नाच्या बोहल्यावर चढणाऱ्या कोल्हापूरच्या आजी-आजोबांच्या जोडीची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात असल्याचं पाहायला मिळत आहे.
‘लग्न म्हणजे केवळ शारीरिक सुख नव्हे’
ही गोष्ट आहे कोल्हापूर जिल्ह्यातील घोसरवाड गावची. येथील 75 वर्षांचे बाबुराव पाटील आणि 70 वर्षांच्या अनुसया शिंदे यांनी लग्नाचा निर्णय घेतला आहे.

बाबुराव सांगतात, “लग्न हे केवळ शारीरिक सुख किंवा वंश वाढवणे एवढंचं नाही. तर एकमेकांना आधार देण्यासाठी ही असतं. म्हणूनच वृद्धाश्रमात असून देखील आम्ही या वयात लग्नाचा निर्णय घेतला आहे.”

“आता जेवढे आयुष्य आहे, ते एकमेकांसोबत सुख-दुःखाने जगायचे ठरवलं आहे,” असं ते पुढे म्हणाले.
वृद्धाश्रमातला आधार हरपला
कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यातील घोसरवाड येथे जानकी वृद्धाश्रम आणि शाळा गेल्या 17 वर्षांपासून सुरू आहे. गावातील सामजिक कार्यकर्ते बाबासाहेब पुजारी हे येथील वृद्धाश्रम चालवतात.

वृद्धाश्रमामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातले सुमारे 30 हून अधिक वृद्ध आश्रयाला आहेत. वेगवेगळ्या परिस्थितीतून त्या वृद्धाश्रमामध्ये आपल्या आयुष्याच्या संध्याकाळचं जीवन जगत आहेत.

बाबुराव पाटील आणि अनुसया शिंदे हेसुद्धा याच ठिकाणी राहत होते.

मूळ पुण्याच्या असलेल्या अनुसया शिंदे या जानकी वृद्धाश्रमात सुरुवातीला आपले पती श्रीरंग शिंदे यांच्यासोबत आल्या होत्या.

श्रीरंग शिंदे आणि अनुसया शिंदे यांनी पाच वर्षांपूर्वी कौटुंबिक कारणामुळे आपलं पुण्यातलं घर सोडलं होतं. सुरुवातीला कोल्हापुरात ते रुकडी याठिकाणी राहिले. इथे एका व्यक्तीने त्यांना काही काळ मदत केली. अखेरीस उतारवयातील आधाराचा शोध घेत ते जानकी वृद्धाश्रमापर्यंत पोहोचले.

याच वृद्धाश्रमात उर्वरित आयुष्य घालवायचं, असं दोघांनीही ठरवलं होतं.

वृद्धाश्रमात राहत असताना त्यांचा एकमेकांना आधार होता. मात्र, चार महिन्यांपूर्वी अनुसया यांचे पती श्रीरंग शिंदे यांचं निधन झाल्यामुळे त्यांच्या आयुष्यात पुन्हा एकटेपणाचा शिरकाव झाला होता.

बाबुराव पाटील यांची करुण कहाणी
अनुसया शिंदे आणि त्यांचे पती श्रीरंग शिंदे ज्या वृद्धाश्रमात राहत होते. त्यात ठिकाणी बाबुराव पाटील दीड वर्षांपूर्वी दाखल झाले.

त्यांचा वृद्धाश्रमापर्यंतचा प्रवासही मन हेलावणारा आहे. बाबुराव यांच्या पत्नीच्या निधनानंतर त्यांनी मुलांना संगोपनासाठी सासरवाडीत सोडलं. पण तिथून त्यांचं आणि मुलांचं नातंच तुटलं.

दरम्यान, कोरोना काळात त्यांचा व्यवसायही बंद पडला. त्यांना आधाराची गरज भासू लागल्याने काही काळ ते मोठ्या भावाकडे राहिले. पण अखेरीस त्यांना जानकी वृद्धाश्रमाची वाट धरावी लागली.

व्हलेंटाईट डे दिवशी आला लग्नाचा विचार
अनुसया शिंदे या चार महिन्यांपूर्वी पतीच्या निधनानंतर एकट्या पडल्या होत्या. दुसऱ्या बाजूला बाबुराव आजोबा हे देखील स्वतःला एकटेपणाला तोंड देत होते.

14 फेब्रुवारी रोजी ‘व्हॅलेंटाईन डे’ हातकणंगलेतील एका महाविद्यालयात वृद्धाश्रमाच्या माध्यमातून एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी तेथील वातावरण पाहून बाबुराव पाटील यांच्या डोक्यात पुन्हा लग्न करण्याचा विचार आला.

मग काय, महाविद्यालयातून कार्यक्रमानंतर पुन्हा वृद्धाश्रमात बाबुराव पोहोचले आणि त्यांनी एखाद्या तरुणाप्रमाणे अनुसया शिंदे यांना प्रपोज केलं.

प्रपोज करताना त्यांनी एक गुलाबाचं फूलही अनुसया यांना दिलं होतं.

पण, अनुसया यांनी बाबुराव यांच्या प्रस्तावाला होकार दिला नाही.

अनुसया यांच्या पतीचं निधन चार महिन्यांपूर्वीच झालेलं होतं. त्या दुःखातून त्या अद्याप बाहेर पडलेल्या नव्हत्या. अनुसया यांनी होकार दिलेला नसला तरी त्यांनी बाबुराव यांना विचार करण्यासाठी काही वेळ मागितली.
अखेर लग्न ठरलं..
दरम्यान, बाबुराव पाटील आणि अनुसया शिंदे यांच्यात काहीतरी सुरू आहे, याची कुणकुण वृद्धाश्रमाचे चालक बाबासाहेब पुजारी यांना लागली होती.

मग पुजारीच यांनी अनुसया शिंदेंना बाबुराव पाटील यांच्यासोबत लग्न करणार आहात का, असं विचारलं.

यातून चर्चा वाढत गेली.

"समाज काय म्हणेल, संस्था चालक काय म्हणतील, या भीतीने आपण अद्याप निर्णय घेतलेला नाही, असं अनुसया शिंदे यांनी पुजारी यांना सांगितलं.

अखेरीस, पुजारी यांनी दोघांना विश्वासात घेऊन त्यांच्यात लग्नासाठी मध्यस्थी केली.

अखेर, अनुसया शिंदे यांनी बाबुराव यांच्यासोबत लग्नाला होकार दिला.

वृद्धाश्रमामार्फत अनुसया आणि बाबुराव यांचं लग्न अगदी विधीवत आणि कायदेशीर पद्धतीने एखाद्या नवीन जोडप्याच्या लग्नाप्रमाणेच पार पडलं.

लग्नानंतरही या दांपत्याने वृद्धाश्रमामध्येच राहण्याचा पर्याय निवडला आहे. त्यामुळे अनुसया-बाबुराव यांचा आयुष्यातील उर्वरित प्रवास हा वृद्धाश्रमातच होणार आहे.