कुरखेडा: चक्क केंद्रप्रमुखाने घेतले कॉपी करण्यासाठी 500 रू


ता. प्र/ कुरखेडा, 8 मार्च : राज्यात बारावीच्या परीक्षेदरम्यान गैरप्रकार होत असल्याचे प्रकरण उघडकीस येत असतांना गडचिरोली जिल्ह्यात चक्क केंद्रप्रमुखच कॉपी करु देण्यास पैसे घेत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने शिक्षण विभागात खळबळ उडाल्याचे दिसून येत आहे.

या व्हिडिओमध्ये चक्क केंद्रप्रमुखाने कॉपी करु देण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वतःच्या रुमवर बोलावून प्रत्येकी पाचशे रुपये घेत असल्याचे दिसून येत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा शहरातल्या शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मधील केंद्रप्रमुख किशोर कोल्हे हे स्वतःच्या रुमवर बोलावून प्रत्येकी पाचशे रुपये घेत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत असून बोर्डाचे भरारी पथक येण्याआधी तातडीने सूचना देण्याचीही माहिती व्हिडीओत सांगितली जात आहे. सदर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गडचिरोलीच्या शिक्षण विभागाने केंद्रप्रमुख किशोर कोल्हे यांना पदावरून हटविले आहे. तर या संपूर्ण वायरल व्हिडीओची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश शिक्षणाधिकारी राजेंद्र निकम यांनी दिले आहेत.

सदर प्रकाराने मात्र कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडतानाचे दिसून येत असून आणखी किती केंद्रावर असा प्रकार घडतो आहे हा सुद्धा संशोधनाचा विषय ठरला आहे.