एवढे पैसे येतात कुठून! 2.21 कोटी रोख, 62 एकर जमीन अन् 1000 गाड्यांचा ताफा घेऊन पोहोचले भाऊ.मुघलांच्या काळापासून नागौरमध्ये मायरा प्रथा लोकप्रिय आहे. आज पुन्हा एकदा नागौरचा मायरा इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला आहे. नागौरच्या 6 भावांनी मायरा प्रथेला पुन्हा चर्चेचा विषय बनवलंय.


या सहा भावांनी आपल्या लाडक्या धाकट्या बहिणीच्या घरी 8 कोटींचा मायरा आणला. मायरा देण्यासाठी त्यांनी एक-दोन नव्हे, तर तब्बल 1000 वाहनांचा ताफाही सोबत आणला होता. मायरामध्ये देशी तूप आणि साखरेने भरलेले ट्रॅक्टरही होते.

नागौर जिल्ह्यातील ढिगसराचे रहिवासी असलेले भगीरथ राम मेहरिया (भाजप नेते), अर्जुन राम मेहरिया (अखिल भारतीय वीर तेजा जन्मस्थळी संस्थान खरनालचे माजी अध्यक्ष), प्रल्हाद, मेहराम आणि उम्मेदारम मेहरिया, असे या सहा भावंडांची नावे आहेत. त्यांनी आपली धाकडी बहीण भंवरी देवीच्या घरी आणलेल्या मायराची सध्या पंचक्रोशित चर्चा आहे.
मायरा का बनला चर्चेचा विषय?
ढिगसरा येथील मेहरिया कुटुंबीय रायधनूच्या गोधरा कुटुंबात मायरा भरण्यासाठी आले. यावेळी गावात आलेला त्यांचा ताफा पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. बहिणीच्या घरी तब्बल 1000 वाहनांचा ताफा आणि वाहनाच्या ताफ्यासमोर नवीन ट्रॅक्टर होते. दोन किलोमीटर लांबीच्या ताफ्यात पुढे धावणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये भात, साखर, तूप आणि इतर धान्यांनी भरलेली पोती होती.

गावभर चांदीच्या नाण्यांचे वाटप
बहिणीच्या घरी आल्यानंतर भावांनी भंवरी देवीच्या डोक्यावर पदर टाकला आणि मायराची सुरुवात केली. यावेळी त्यांनी मायरामध्ये बहिणीला 62 एकर जमीन, राष्ट्रीय महामार्गावरील 1 एकरचा भूखंड, नवीन ट्रॅक्टर-ट्रॉली, गूळाची ढेप, तूपाने भरलेली भांडी, 1 किलो 125 ग्रॅम सोनं, 14 किलो 250 ग्रॅम चांदी, 2 कोटी 2 लाख 31 हजार 101 रुपये रोख आणि रायधानू गावातील एकूण 800 घरांना 1-1 ब्लँकेट आणि चांदीचे नाणे वाटप केले.
मायरा काय आहे?

मायरा देण्याची परंपरा म्हणजे, मामा आपल्या भाच्चा-भाच्ची किंवा बहिणीच्या लग्नात कपडे, पैसे आणि इतर गोष्टी देतो. यासोबतच बहिणीच्या सासरच्या लोकांसाठी परिस्थितीनुसार भेटवस्तूही आणल्या जातात. महाराष्ट्राच्या भाषेत सांगायचे झाले तर हूंडा किंवा ओटी भरणे म्हणता येईल. राजस्थानच्या नागौर जिल्ह्यात भाऊ आपल्या बहिणींसाठी लाखो-करोडो रुपयांचा मायरा आणतात.
-०-